छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर येथील अण्णा भाऊ साठे चौकात काही टवाळखोर तरुणांनी एका मुलीवर थेट चाकू उगारल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शहरात खळबळ उडाली आहे.
नशेत धुंद तरुणांची दहशत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणांनी दारू आणि गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन केलं होतं. नशेत धुंद असलेल्या या टोळक्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलीला अडवून तिच्यावर चाकू उगारला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळावरील काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र भरवस्तीत दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



